Breaking News

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना : अहिल्यानगरात १,०४४ शेतकरी कुटुंबांना २३.५३ कोटींचे सानुग्रह अनुदान

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा


अहिल्यानगर, दि. ३० जून :- शेती व्यवसाय करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अहिल्यानगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. एप्रिल २०२३ पासून विमा कंपन्यांऐवजी थेट शासकीय अनुदानाच्या स्वरूपात ही योजना लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबांना जलद गतीने आर्थिक मदत मिळाली आहे.


राज्यातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व खातेदार शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेले पती, पत्नी, आई, वडील, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळतो. शेती करताना वीज पडणे, सर्पदंश, पूर, रस्ता अथवा रेल्वे अपघात, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, विषबाधा, विजेचा शॉक, पाण्यात बुडून मृत्यू, विंचूदंश, खून, नक्षलवाद्यांकडून हत्या, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच अन्य अपघातांचा या योजनेत समावेश आहे. अपघाती मृत्यू तसेच दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक डोळा व एक हात अथवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.


अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन बंद पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सन २००५-०६ मध्ये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. सन २००९-१० मध्ये या योजनेच्या नावात बदल करण्यात आला आणि सन २०१५-१६ पासून ती गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राबविण्यात येऊ लागली. सन २०२२-२३ पर्यंत विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत दावे नामंजूर होणे तसेच दाव्यांच्या निकाली विलंब होणे अशा अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने १७ मार्च २०२३ रोजी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यात आली.


अहिल्यानगर, श्रीरामपूर, कर्जत आणि संगमनेर या उपविभागांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जुन्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १८३ लाभार्थ्यांना ३ कोटी ६४ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात २५२ लाभार्थ्यांना ५ कोटी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नवीन योजना लागू झाल्यानंतर सन २०२३-२४ मध्ये २४५ प्रस्तावांसाठी ४ कोटी ८२ लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ४४९ प्रस्तावांसाठी ८ कोटी ७६ लाख रुपये आणि सन २०२५-२६ मध्ये ३५० प्रस्तावांसाठी ६ कोटी ९४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे.


अपघात झाल्यानंतर वारसदारांनी ३० दिवसांच्या आत विहित नमुन्यातील अर्जासह सातबारा उतारा, ८-अ, फेरफार उतारा, मृत्यू किंवा अपंगत्वाचा दाखला, जन्मदाखला, वाहन अपघाताच्या प्रकरणात वैध वाहन परवाना, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) अथवा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, वारसाचे प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड आणि बँक पासबुकची प्रत आदी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. तालुकास्तरीय समितीकडून प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर तो जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येते.


पात्र लाभार्थ्यांनी अपघात झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


#अपघातसुरक्षायोजना #FinancialSupport #अहिल्यानगर #Ahilyanagar #शेतकरीसानुग्रहअनुदान #FarmersWelfare #गोपीनाथमुंडेयोजना #AgriSafety #आर्थिकआधार #FarmersFirst

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.