अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन विकास अभियानातून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अहिल्यानगर, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २०२६-२७ या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत असून, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १९.११ कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी संचालक (फलोत्पादन) अंकुश माने यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांची निवड 'प्रथम अर्ज, प्रथम लाभ' या तत्त्वानुसार करण्यात येईल. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडे जातीचे प्रमाणपत्र व फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर स्थळ तपासणी करण्यात येऊन अनुदानाची रक्कम तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
या अभियानाअंतर्गत लहान व मोठ्या रोपवाटिका उभारणीसाठी अनुदान दिले जाते. तसेच स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, द्राक्ष, खजूर, केळी, अननस, अवोकॅडो आणि पपई या फळपिकांसाठी ठिबक सिंचनाशिवाय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. अळिंबी उत्पादन प्रकल्प, अळिंबी बीज उत्पादन केंद्र तसेच कंपोस्ट निर्मिती युनिट उभारण्यासाठीही लाभ दिला जातो. याशिवाय सुटीफुले, दांड्याची फुले, कंदवर्गीय फुले, बी वर्गीय व कंदवर्गीय मसाले, खर्चीक व इतर सुगंधी वनस्पती तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठीदेखील अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते.
शेतीतील पायाभूत सुविधा व यांत्रिकीकरणासाठी सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांचे अस्तरीकरण, हरितगृह, बांबू अथवा केबल पर्लिन स्ट्रक्चर, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, फळांना कव्हर तसेच तण नियंत्रक आच्छादन या घटकांवर अनुदान दिले जाते. मधुमक्षिका वसाहत, पेटी आणि मध काढणी यंत्रासाठीही शेतकरी अर्ज करू शकतात. यांत्रिकीकरणांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मॅन्युअल व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर तसेच ट्रॅक्टरचलित विविध प्रकारचे स्प्रेअर खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, कांदाचाळ तसेच लसूण साठवणूक गृह उभारण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध घटकांसाठी किमान व कमाल अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर संबंधित घटकानुसार प्रत्यक्ष देय अनुदान निश्चित करण्यात येईल.
#फलोत्पादनअभियान2026 #HorticultureMission #अहिल्यानगर #Ahilyanagar #महाडीबीटीपोर्टल #MahaDBT

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.