जेजुरीजवळील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट; मृतांच्या वारसांना ₹5 लाख मदत
उपशीर्षक:
जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश; वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांना सावधगिरीचे आवाहन
पुणे | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील. आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, भावार्थ देखणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारी मार्गावरील सर्व आवश्यक कामांचा नियमित आढावा घेण्यात आला असून, वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.