Breaking News

२० वर्षांनंतर शिवरस्ता मोकळा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू!


अहिल्यानगर


श्रीगोंदा | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव–हिरडगाव शिवरस्त्यावरील तब्बल २० वर्षांपासूनचा अडथळा अखेर दूर झाला आहे. महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे ३.५ किलोमीटर लांबीच्या शिवरस्त्याचे यशस्वी सीमांकन करून अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे १५ ते २० फूट रुंदीचा शिवरस्ता पुन्हा शेतकऱ्यांसाठी वाहतुकीस खुला झाला आहे.

ही कार्यवाही मुख्यमंत्री बळीराजा शिवपाणंद रस्ते योजना अंतर्गत तहसीलदार सचिन डोंगरे आणि भूमी अभिलेख अधीक्षक अविनाश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला.

शिवरस्ता खुला झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. एका शेतकऱ्याने भावना व्यक्त करत सांगितले, "२० वर्षांनंतर पहिल्यांदाच माझी मोटारसायकल शिवरस्त्याने थेट घरापर्यंत पोहोचली... सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले!"

शिवरस्ते हे केवळ वाहतुकीचे मार्ग नसून शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतीमालाची वाहतूक, कृषी अवजारे ने-आण आणि आपत्कालीन परिस्थितीत सहज संपर्क यासाठी अशा रस्त्यांची मोठी गरज असते. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण विकासाला नवी गती मिळणार आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.