Breaking News

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे विनाविलंब परत करण्यासाठी प्रक्रियेला गती द्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

 



बीड, दि. १० : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत मिळावेत, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपस्थित होते. तसेच खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे प्रस्ताव नव्याने तयार करून नामांकित व विश्वासार्ह व्यावसायिक संस्थेमार्फत पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. खासगी क्षेत्रातील निकषांनुसार पारदर्शक व अचूक मूल्यांकन झाल्यास मालमत्तेची वास्तविक किंमत समोर येईल आणि ठेवीदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल.

आढावा बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या २५० स्थावर, ७४ जंगम मालमत्ता आणि ४० बँक खाती जप्त करण्यात आली असून त्यांचे सध्याचे एकूण मूल्यांकन १७२.०३ कोटी रुपये आहे. पोलिस विभागाने मुद्रांक विभागाच्या चालू वर्षातील शीघ्रसिद्ध गणकपत्रकानुसार या मालमत्तांचे मूल्य ३९९.०३ कोटी रुपये इतके असल्याचे नमूद केले आहे.

जप्त मालमत्तांच्या लिलावासाठी आवश्यक मंजुरी लवकर मिळावी यासाठी बीड येथे स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी उच्च न्यायालयाकडे पाठविला असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. व्यावसायिक मूल्यांकन संस्थेमार्फत पुनर्मूल्यांकन केल्यास मालमत्तेचे मूल्य अंदाजे चारपट वाढू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, ज्ञानराधा सोसायटीचे ३९,०७६ मूळ ठेवीदार आहेत. सुरेश कुटे व त्यांच्या निकटवर्तीयांना विनातारण आणि नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करण्यात आले. ठेवीदारांचा निधी कुटे समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये वळविण्यात आला. या कंपन्यांनी संबंधित मालमत्ता विविध बँकांकडे तारण ठेवून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे संबंधित बँकांनी एनसीएलटी (National Company Law Tribunal) कडे दावे दाखल केले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयाकडे आवश्यक अधिसूचना काढण्याबाबत तातडीने विनंती करून सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.