Breaking News

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' माहितीपटाचा प्रीमियर शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शानदार सोहळा

 संपादक रविराज शिंदे आपलं सत्य अहिल्यानगर 



माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त निर्मितीचा २२ मिनिटांचा माहितीपट ९ वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये प्रसारित होणार

मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित 'पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा' या माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईतील आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

या माहितीपटामध्ये पंढरपूर वारीचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा प्रभावी दृश्यांमधून उलगडण्यात आला आहे. माहितीपट पाहताना जणू काही प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा अनुभव घेत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे.

२२ मिनिटांचा हा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, मराठीसह इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

या माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी समूहाच्या डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो अशा नऊ उपग्रह वाहिन्यांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा आणि संतांचा संदेश देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.