कडक सुरक्षा व्यवस्थेत ६२ आरोपींचे जामखेडहून नाशिकला स्थलांतर
जामखेड उपकारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी
जामखेड, दि. ९ : राज्य शासनाच्या धोरणानुसार जामखेड येथील उपकारागृह कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. या निर्णयानुसार उपकारागृहातील एकूण ६२ आरोपींची (यामध्ये ३ महिला आरोपींचाही समावेश) कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था आणि कारागृह व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या स्थलांतरावेळी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली.
उपकारागृह बंद झाल्यानंतर आता जामखेड येथे केवळ पोलीस कोठडीतील (Police Custody) आरोपींनाच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयीन कोठडीतील (Judicial Custody) आरोपींना पुढील काळात नाशिक किंवा संबंधित कारागृहात हलविण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे जामखेड उपकारागृहाचा अध्याय संपुष्टात आला असून, कारागृह व्यवस्थापनात महत्त्वाचा बदल झाल्याचे मानले जात आहे.



No comments
Note: Only a member of this blog may post a comment.