श्रीगोंदातील काष्टी येथील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बारवर मोठी कारवाई; अनैतिक व्यापार प्रकरणी आस्थापना बंद करण्याचे आदेश
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावातील हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर-दौंड राज्य महामार्गावरील काष्टी येथील या हॉटेलमध्ये महिलांना बाहेरून बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था केली जात होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकारामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी तसेच कलकत्ता येथील सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते आणि किर्थिश सुधाकर हेगडे यांच्यासह शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनावणीची संधी दिली, मात्र संबंधित गैरहजर
या कारवाईपूर्वी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित आस्थापनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी १५ जून आणि १९ जून रोजी सुनावणीची संधी देण्यात आली होती. मात्र, संबंधित मालक अथवा प्रतिनिधी सुनावणीस हजर राहिले नाहीत. त्यामुळे उपलब्ध पुरावे, पोलीस अहवाल आणि तपासातील निष्कर्षांचा विचार करून अंतिम आदेश पारित करण्यात आला.
पोलीस अहवालात गंभीर निरीक्षणे
पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालात संबंधित हॉटेलचा वापर सातत्याने अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण होत असून महिलांच्या शोषणालाही खतपाणी मिळत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही वापर झाल्याचा उल्लेख
आदेशात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित आस्थापनेचा यापूर्वीही अशाच बेकायदेशीर कामांसाठी वापर झाल्याची नोंद आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि संबंधित ठिकाणाचा गैरवापर रोखता यावा, या उद्देशाने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तात्काळ अंमलबजावणीचे आदेश
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार, देहव्यवसाय किंवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मूळ जमीनमालक आणि घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाचा स्पष्ट संदेश
या कारवाईमुळे अनैतिक व्यापार, महिलांचे शोषण आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण (Zero Tolerance Policy) अवलंबल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे प्रशासनाकडून संकेत मिळत आहेत.

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.