अनैतिक व्यापार प्रकरणी बनपिंप्रीतील हॉटेल सुप्रिम बंद; प्रशासनाचे आदेश
अहिल्यानगर | प्रतिनिधी | २१ जुलै
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रिममध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित हॉटेल बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून श्रीगोंदा–पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी आदेश पारित केला.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या अहवालानुसार, हॉटेल सुप्रिममध्ये आसाम, गुजरात आणि महाराष्ट्रातील सात महिलांना पैशाचे आमिष दाखवून ठेवण्यात आले होते. पुरुष ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्यामार्फत देहव्यापार सुरू असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी हॉटेल चालक व मालक किरण रावसाहेब जरे आणि सुनील नाना पठारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाने कारवाईपूर्वी संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिली होती. हॉटेल मालकाने जागा भाडेकराराने दिली असल्याचा, अनैतिक प्रकाराची माहिती नसल्याचा तसेच कारवाईमुळे कुटुंबाच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असा दावा केला. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने केवळ गुन्हा दाखल झाल्याच्या आधारावर कारवाई करू नये, अशी मागणीही करण्यात आली होती.
मात्र, पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालात संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आल्याने सार्वजनिक हित आणि कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हॉटेल बंद करण्याची कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.
प्रशासनाने आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना दिले असून अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यात संबंधित जागेचा पुन्हा अनैतिक व्यापारासाठी वापर झाल्यास त्याची जबाबदारी मूळ जमीन अथवा घरमालकावर राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
टीप: या प्रकरणातील आरोपांवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून अंतिम दोषनिर्णय न्यायालयाकडून होणे बाकी आहे.

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.