Breaking News

जामखेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; १६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार जण ताब्यात

 


जामखेड | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह सुमारे १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ४ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही मोहीम राबवली.

पोलिसांना पिंपरखेड ते बावी मार्गावरील पिंपरखेड शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता चार ट्रॅक्टर-ट्रॉलींमधून अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेत कारवाई केली.

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  • शाकिर हुसेन शेख (वय ३५, रा. पिंपरखेड)
  • अर्जुन बलभीम लबडे (वय ४२, रा. पिंपरखेड)
  • रामदास नवनाथ कदम (वय ३५, रा. पिंपरखेड)
  • अंगद सर्जेराव कदम (वय ३२, रा. पिंपरखेड)

आरोपींच्या ताब्यातून ४ ब्रास वाळू, चार ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण १६,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार योगेश दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. क्र. ४८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस नाईक रवींद्र वाघ, पोलीस अंमलदार योगेश दळवी आणि ज्ञानेश्वर बेल्हेकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.