शेतजमिनीच्या वाटपाच्या नोंदणीला शुल्कमुक्ती; शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा
मुंबई | प्रतिनिधी
शेतकरी कुटुंबांची शेतजमिनीच्या वाटपाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी अधिनियम, १९०८ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ८५ अन्वये सहधारक तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखांवर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.
या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांना जमिनीच्या कौटुंबिक वाटपासाठी आर्थिक दिलासा मिळणार असून, नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि जलद होण्यास मदत होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कौटुंबिक वाटणीची प्रकरणेही मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नोंदणी शुल्कातून सूट मिळाल्याने शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल. तसेच महसूल विभागाच्या लोकाभिमुख धोरणांमुळे नागरिकांना अधिक प्रभावी आणि सुलभ सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
महसूल विभागाच्या या निर्णयाचे राज्यभरातील शेतकरी व कृषी क्षेत्रातील विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून, हा निर्णय ग्रामीण भागातील हजारो शेतकरी कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.