उपसंचालक आरोग्य सेवांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना चौकशीचे आदेश
अहिल्यानगर, दि. – जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. मनोज शिंदे, वैद्यकीय अधिकारी, हे बेकायदेशीररित्या रित्या कामकाज करत असल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीची दखल घेत उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांना संबंधित तक्रारीची सखोल चौकशी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, अॅड. कृष्णा सोमनाथ शिंदे यांनी २२ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अर्जामध्ये ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे कार्यरत असलेले डॉ. मनोज शिंदे हे बेकायदेशीररित्या कामकाज करत असल्याचा आरोप केला आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत उपसंचालक कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीनंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल नाशिक मंडळाच्या कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या पत्रामुळे संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे आरोग्य विभागासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. चौकशी अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय किंवा कायदेशीर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित पत्रात केवळ तक्रारीच्या आधारे चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरविण्यात आलेले नाही. अंतिम निर्णय हा चौकशी अहवाल व उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच घेतला जाणार
आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.