Breaking News

शासनाच्या योजना गावागावात पोहोचवा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश


अहिल्यानगर, दि. ३ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे. ग्रामस्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.


श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव व ढोरेज येथे विविध विकासकामांची पाहणी तसेच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. 


यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक सोनवलकर (बेलवंडी) तसेच तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामस्तरीय कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, ग्रामस्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमितपणे गावांमध्ये जाऊन शासनाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी गावपातळीवरच सेवा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.


प्राथमिक आरोग्य सेवांवर भर द्या


दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी कोळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा सक्षम ठेवाव्यात. तसेच जास्तीत जास्त सुरक्षित प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात होतील, यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.


ग्रामसचिवालयाचे काम गुणवत्तापूर्ण पूर्ण करा


यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ग्रामसचिवालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. शासकीय इमारतींची बांधकामे निर्धारित वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध होतील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


आधुनिक शेतीला प्रोत्साहन; पॉलीहाऊसची पाहणी


कोळगाव येथील प्रगतशील शेतकरी हेमंत लगड यांच्या पॉलीहाऊसमधील मिरची आणि डाळिंब बागेची जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचे हे आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन, पॉलीहाऊस शेती आणि उच्च मूल्य पिकांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी अशा नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.


शिवपानंद रस्त्याची पाहणी; ग्रामस्थांशी थेट संवाद


ढोरेज येथे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शिवपानंद रस्ता खुला करण्यासाठी करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गामुळे वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम झाली असून विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


दौऱ्यादरम्यान अनेक वर्षांनंतर प्रथमच जिल्हाधिकारी थेट गावात आल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनीही प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्यासाठी अशा प्रत्यक्ष गावभेटी सातत्याने सुरू राहतील, अशी ग्वाही दिली.


#GoodGovernance #अहिल्यानगर #Ahilyanagar #श्रीगोंदातालुका #ShrigondaUpdates #विकासकामेपाहणी #DevelopmentDrive #थेटसंवाद

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.