Breaking News

अटींशिवाय सर्वसमावेशक कर्जमाफीची मागणी; रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार यांच्यासह शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 

सरसकट कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; अन्यायकारक अटी रद्द करण्याची मागणी

मुंबई, दि. २ जुलै : राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी स्वागतार्ह असली, तरी त्यामध्ये घालण्यात आलेल्या विविध अटी व शर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सर्वसमावेशक आणि सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मा. गिरीश महाजन यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जमाफीच्या निकषांमधील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यापूर्वी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेतकरी हितासाठीचा हा लढा शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.