आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांसाठी 'चरण सेवा' उपक्रम; १२ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी सेवेत
प्रतिनिधी बापूराव मते उपसंपादक
पालखी मार्गावरील ४०० मुक्कामस्थळी मोफत आरोग्यसेवा; मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून उपक्रम
बातमी:
मुंबई, दि. २ जुलै : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरण सेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांमधील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षी या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरण सेवा, वैद्यकीय तपासणी व उपचार सुविधा देण्यात आल्या. तसेच १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला.
'भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची' या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देणारा ठरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.