देवदैठणमध्ये घराला धोका; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही, रहिवाशाचा गंभीर आरोप
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी लक्ष्मण बाबन वाघमारे यांनी आपल्या राहत्या घराला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तक्रारदार लक्ष्मण वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते देवदैठण येथील गट क्रमांक ५६५ मध्ये गेल्या २२ वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. शेजारी राहणाऱ्या नामदेव बाबुराव वाघमारे यांनी त्यांच्या शेताच्या सपाटीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केल्यामुळे वाघमारे यांच्या घरालगतची नैसर्गिक पाण्याची निचरा व्यवस्था बंद झाली आहे.
यामुळे पावसाळ्यात पाणी थेट घराच्या भिंतीमध्ये झिरपत असून भिंतीला तडे गेल्याचा तसेच घर कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या परिस्थितीमुळे कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी तक्रारदारांनी १९ जुलै २०१९ रोजी तहसीलदारांकडे प्रथम लेखी तक्रार दिली होती. त्यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच बेलवंडी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली. मात्र, आजपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीकडून पुन्हा मुरूम व मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून मातीचा भराव हटवावा व घराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
देवदैठण# #श्रीगोंदा #अहिल्यानगर #घरालाधोका #स्थानिकबातमी


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.