एफडीए तक्रार पोर्टल : अन्न व औषध सुरक्षिततेसाठी नागरिकाभिमुख डिजिटल व्यासपीठ
विशेष लेख
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पुढाकारातून नागरिकांना अन्न व औषधांबाबतच्या तक्रारी सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने नोंदविता याव्यात, त्यांचा मागोवा घेता यावा आणि कार्यवाहीची माहिती वेळेवर मिळावी, या उद्देशाने complaints.mahafda.in हे डिजिटल तक्रार पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईलद्वारे उपलब्ध सेवा, तक्रार ट्रॅकिंग, अधिकारी डॅशबोर्ड आणि माहितीच्या गोपनीयतेची आधुनिक मानके यांचा समावेश असलेले हे पोर्टल नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक करणारे व्यासपीठ ठरणार आहे.
अन्न व औषधांची गुणवत्ता ही सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित बाब आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, मुदतबाह्य औषधे, निकृष्ट दर्जाची उत्पादने, अस्वच्छ उत्पादन किंवा साठवण व्यवस्था यांसारख्या बाबींविषयी नागरिकांना सक्षम आणि विश्वासार्ह तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिक कोणत्याही वेळेस मोबाईल किंवा संगणकाद्वारे तक्रार नोंदवू शकतात, तिची सद्यस्थिती पाहू शकतात आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत माहिती त्वरित पोहोचवू शकतात.
हे पोर्टल मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. मोबाईल क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून ओटीपी प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदविताना संबंधित जिल्हा, दुकान, हॉटेल, औषध विक्रेता, उत्पादक किंवा ब्रँडची माहिती तसेच तक्रारीचे स्वरूप नमूद करता येते. 'स्पीच टू टेक्स्ट' सुविधेमुळे बोलूनही माहिती नोंदविण्याची सोय उपलब्ध आहे.
तक्रारीच्या पडताळणीसाठी बिल, छायाचित्रे, उत्पादनाचे तपशील, बॅच क्रमांक किंवा इतर आवश्यक पुरावे जोडता येतात. तक्रार नोंदविताना स्थानाची माहिती देणे अनिवार्य ठेवण्यात आले असून त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करणे सुलभ होते. कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारी असल्यास संबंधित विभागाबाबत मार्गदर्शन केले जाते, तर अपूर्ण किंवा आवश्यक माहिती नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत.
प्रत्येक तक्रारीला स्वतंत्र ट्रॅकिंग क्रमांक दिला जातो. त्याद्वारे तक्रारदाराला आपल्या तक्रारीची सद्यस्थिती, संबंधित अधिकाऱ्यांकडील कार्यवाही आणि अंतिम अहवालाचा मागोवा घेता येतो. यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वास वाढण्यास मदत होते.
या पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. प्रणाली तक्रारींची तीव्रता, जिल्हानिहाय वितरण, कालावधी आणि प्राधान्यक्रम यांचे विश्लेषण करते. अन्नविषबाधेसारख्या गंभीर तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य देऊन त्या तातडीने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जातात. तसेच तक्रारीतील माहितीचे विश्लेषण करून तिची विश्वासार्हता तपासली जाते, त्यामुळे प्राथमिक छाननी अधिक परिणामकारकपणे करता येते.
अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र डिजिटल डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असून प्राप्त तक्रारी, प्रलंबित प्रकरणे, जिल्हानिहाय वर्गीकरण आणि कार्यवाहीचा आढावा एका ठिकाणी उपलब्ध होतो. आयुक्त, सहआयुक्त, प्रादेशिक सहआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील माहिती तत्काळ उपलब्ध होत असल्याने देखरेख आणि निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान होते.
अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक सुविधेमुळे कायदेशीर संदर्भ शोधणे, कारणे दाखवा नोटीस तयार करणे, 'स्पीच टू टेक्स्ट'च्या साहाय्याने मसुदे तयार करणे आणि संबंधित कायद्यांतील तरतुदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कार्यवाहीची परिणामकारकता आणि वेग वाढण्यास मदत होते.
प्रणालीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामकाजाची स्वतंत्र लेखापरीक्षण नोंद ठेवली जाते. कोणत्या अधिकाऱ्याने तक्रार कधी पाहिली, कोणती कार्यवाही केली आणि प्रणालीचा किती वापर केला याची नोंद उपलब्ध असल्याने प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता अधिक बळकट होते.
डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षणाच्या तत्त्वांचा विचार करून पोर्टलमध्ये आवश्यक गोपनीयता उपायांचा समावेश करण्यात आला आहे. तक्रारदाराची संमती, माहितीच्या वापराबाबत पारदर्शकता आणि आवश्यकतेनुसार माहिती हटविण्याचा पर्याय यामुळे नागरिकांच्या माहितीचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले आहे.
पोर्टलवर नोंदविलेली तक्रार संबंधित प्रादेशिक सहआयुक्तांकडे पोहोचते. कामकाजाच्या २४ तासांच्या आत ती संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तक्रारीच्या स्वरूपानुसार तपासणी, कार्यवाही आणि अहवाल सादर करण्यासाठी निश्चित कालमर्यादा निर्धारित करण्यात आली असून आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावरून प्रकरणाचे पुनर्वाटप करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
ही व्यवस्था प्रभावी होण्यासाठी नागरिकांचा जबाबदार सहभाग आवश्यक आहे. तक्रार नोंदवताना संपूर्ण, अचूक आणि सविस्तर माहिती पुराव्यासह देणे अपेक्षित आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी तक्रार केल्यास त्याची नोंद प्रणालीमध्ये राहते. त्यामुळे केवळ वास्तविक आणि सार्वजनिक हिताशी संबंधित तक्रारीच नोंदविणे आवश्यक आहे.
डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था आणि उत्तरदायी प्रशासन यांचा समन्वय साधणारे complaints.mahafda.in हे पोर्टल कालच नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना अन्न व औषधांबाबत थेट प्रशासनाशी जोडणारी ही यंत्रणा सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी, तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि नागरिककेंद्रित प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, अहिल्यानगर
#एफडीएतक्रारपोर्टल #FDAMahaGov #अहिल्यानगर #Ahilyanagar #अन्नवऔधधसुरक्षा #FoodAndDrugSafety #डिजिटलप्रशासन #DigitalGovernance #तुकाराममुंडे #TukaramMunde


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.