Breaking News

गंभीर अपघातग्रस्त १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य


मुंबई, दि. २ जुलै : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या तातडीच्या मदतीमुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडली असून पुढील उपचारही विलंब न होता सुरू ठेवणे शक्य झाले आहे.

सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. त्यांना फलटण (जि. सातारा) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.

नातेवाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सहकार्याने २५ जून रोजी आर्थिक सहाय्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकडे अर्ज सादर करण्यात आला. अर्ज प्राप्त होताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रकरणावर तातडीने कार्यवाही केली. अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्यास मंजुरी देण्यात आल्याने उपचारात कोणताही विलंब झाला नाही आणि आवश्यक वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध झाली.

या आर्थिक सहाय्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया होऊन सरूबाई मुंजवार यांच्या उपचारांना गती मिळाली. याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अल्पावधीत आर्थिक सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती अवलंबिली जाते. गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.