आषाढी वारी २०२६ : अहिल्यानगरमध्ये ८,६०० वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम, १० ते १७ जुलै मोफत आरोग्यसेवा
विशेष वृत्त
आषाढी वारीनिमित्त जिल्ह्यात हजारो वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम !
मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून १० ते १७ जुलैदरम्यान मोफत चरणसेवा अभियान
अहिल्यानगर, दि. २ : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, आयुर्वेदिक पद्धतीने पायांची मालिश तसेच अल्पोपहार उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने 'चरणसेवा उपक्रम – २०२६' राबविण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासनाकडून या उपक्रमासाठी आवश्यक नियोजन व सहकार्य करण्यात आले आहे.
हा विशेष उपक्रम १० ते १७ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पालखी मार्गांवर तसेच विसावा स्थळांवर आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज, गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आणि शेवगाव येथील श्री एकनाथ आयुर्वेद रुग्णालयातील शेकडो वैद्यकीय विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सेवा देणार आहेत.
सरला बेट येथील गंगागिरी महाराज दिंडी, ताहराबादची महिपती महाराज दिंडी, शिर्डीची श्री साईबाबा दिंडी तसेच अमळनेरच्या संत सखाराम महाराज दिंडीसह २२ हून अधिक प्रमुख पायी दिंड्यांतील सुमारे ८ हजार ६०० वारकऱ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. सततच्या पायी प्रवासामुळे वारकऱ्यांच्या पायांवर येणारा ताण कमी करण्यासाठी वातशामक आयुर्वेदिक तेलाचा वापर करून स्वयंसेवकांकडून पायांची मालिश करण्यात येणार आहे.
उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सल्ला, विश्रांतीची सुविधा तसेच सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रानुसार चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवकांना टी-शर्ट, हातमोजे व मास्क उपलब्ध करून देण्यात आले असून वारकऱ्यांसाठी खुर्च्या आणि चटयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य लाभत आहे.
निवडक ठिकाणी आरोग्य जनजागृती रथ आणि रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात येणार असून संसर्गजन्य आजारांपासून बचाव, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समन्वयकांची नियुक्ती संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध शिबिरांच्या नियोजन व समन्वयाची जबाबदारी हेमंत झेंडे, डॉ. समीर होळकर, देवराव चित्ते, डॉ. शिवाजी काळे तसेच स्थानिक स्तरावर सरपंच गौतम पठारे, शिवाजी शेळके आणि वैभव रोडी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या मोफत आरोग्यसेवा व चरणसेवा उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
#आषाढीवारी2026 #WariSeva #अहिल्यानगर #Ahilyanagar #चरणसेवाउपक्रम #WarkariWelfare #मुख्यमंत्रीसाहाय्यता #MedicalCamp #आरोग्यसेवा

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.