मनरेगा मजुरांचे वेतन महिनाभरापासून रखडले; FTO बँकेकडे पाठवूनही खात्यात रक्कम जमा नाही अहिल्यानगरसह राज्यातील हजारो मजुरांमध्ये संताप; केंद्र शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून वेतन अदा करण्याची मागणी
अहिल्यानगर, दि. १ जुलै : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे वेतन गेल्या महिनाभरापासून प्रलंबित असल्याने ग्रामीण भागातील हजारो मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतमजुरीचा हंगाम सुरू असतानाच मनरेगा मजुरी वेळेत न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मनरेगा FTO (Fund Transfer Order) Tracking System वरील माहितीनुसार संबंधित FTO क्रमांक MH180007999_295026AP8_FTO_23959 ची प्रक्रिया पूर्ण करून १ जून २०२६ रोजी निधी बँकेकडे (Sent to Bank) पाठविण्यात आला आहे. त्यापूर्वी FTO मंजुरी, Program Officer आणि DDO यांच्या स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर 'Debit Status' आणि 'Not Processed' या टप्प्यावर प्रक्रिया अडकलेली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पात्र मजुरांच्या बँक खात्यात अद्याप वेतन जमा झालेले नाही.
मनरेगा योजनेअंतर्गत काम करणारे बहुतांश मजूर हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन मजुरीवर अवलंबून असतो. वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, कर्जाचे हप्ते आणि इतर दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. अनेक गावांतील मजुरांनी याबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
मनरेगा योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत रोजगार व मजुरी उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र निधी वितरणात होणारा विलंब हा योजनेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासणारा ठरत असल्याची भावना मजुरांकडून व्यक्त होत आहे.
मजुरांनी केंद्र शासन, ग्रामीण विकास मंत्रालय, राज्य शासन, PFMS आणि संबंधित बँकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित निधी मंजूर करावा व मजुरांच्या खात्यात वेतन त्वरित जमा करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मनरेगा मजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली न निघाल्यास संबंधित मजूर संघटना आणि ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.