भाविकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा; एसटीच्या महसूलवाढीसह युवकांना रोजगाराच्या नव्या संधी'
भाविकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा; एसटीच्या महसूलवाढीसह युवकांना रोजगाराच्या नव्या संधी
मुंबई, दि. १ जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन' योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार असून एसटी महामंडळाच्या महसूलवाढीलाही चालना मिळणार आहे.
नवीन धोरणानुसार राज्यभरातून सहा प्रादेशिक पर्यटन संस्थांची निवड करण्यात येणार आहे. या संस्थांमार्फत तीर्थयात्रांचे नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक, टोल, पार्किंग, प्रवेश शुल्क आदी पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मात्र, बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडेच राहणार आहे.
या योजनेत शासनाच्या विविध सामाजिक घटकांना लागू असलेल्या प्रवास सवलती कायम राहणार असल्याने खासगी पर्यटन संस्थांच्या तुलनेत भाविकांना कमी खर्चात तीर्थयात्रेचा लाभ मिळणार आहे.
ही योजना केवळ धार्मिक पर्यटनालाच चालना देणारी नसून राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करणारी ठरणार आहे. मोठी भांडवली गुंतवणूक न करता पर्यटन नियोजन, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल.
भाविकांना गुणवत्तापूर्ण सेवा, एसटी महामंडळाच्या आर्थिक बळकटीस हातभार आणि महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाचा विकास या त्रिसूत्री उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील तीर्थाटन व्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.