Breaking News

गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक उघड; अहिल्यानगरात 26.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक उघड; 26.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळुंज बायपासवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनचालक ताब्यात, तिघे फरार

अहिल्यानगर, प्रतिनिधी : गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर स्थानिक गुन्हे शाखेने वाळुंज बायपास येथे धडक कारवाई करत तब्बल 26 लाख 77 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स, आयशर टेम्पो आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील तिघे संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना 20 ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एमएच-43-बीजी-7280 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली दारू वाळुंज बायपासमार्गे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच संतोष खैरे, विजय ठोंबरे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, भगवान थोरात, प्रशांत राठोड आणि सुनील मालणकर यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत संशयित टेम्पो अडवून तपासणी केली. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला.

वाहनचालक नितीन रमेश तांबसकर (वय 35, रा. टेंबवाडी, चराटे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

  • रॉयल स्टॅग सुपेरियर व्हिस्की – 80 बॉक्स (₹3,64,800)
  • इंपेरियल ब्लू व्हिस्की – 97 बॉक्स (₹3,95,760)
  • मॅकडॉल नं. 1 व्हिस्की – 49 बॉक्स (₹1,99,920)
  • रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की – 398 बॉक्स (₹6,68,640)
  • एडरियल क्लासिक व्हिस्की – 20 बॉक्स (₹28,800)
  • आयशर टेम्पो – ₹10,00,000
  • मोबाईल फोन – ₹20,000

एकूण जप्त मुद्देमाल : ₹26,77,920

पोलिसांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक बॉक्सवर "FOR SALE IN GOA ONLY" असा स्पष्ट उल्लेख होता.

करमाळ्याकडे होत होती वाहतूक

प्राथमिक चौकशीत चालकाने ही दारू धाराशिव येथील शत्रुघ्न किरदक यांच्या सांगण्यावरून आणल्याची माहिती दिली. तसेच सावंतवाडी येथील प्रसाद सावंत व त्याच्या दोन साथीदारांनी ही दारू विनापरवाना टेम्पोमध्ये भरून करमाळा (जि. सोलापूर) येथे पाठविल्याचेही समोर आले. या प्रकरणातील शत्रुघ्न किरदक, प्रसाद सावंत व त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रताप तान्हाजी देवकाते यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 719/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65(अ), 65(ई), 80(1)(2), 81, 83, 90 आणि 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.



Tags: #Ahilyanagar #LCB #IllegalLiquor #GoaLiquor #CrimeNews #PoliceAction #Maharashtra #ValunjBypass #LiquorSmuggling #BreakingNews



No comments

Note: Only a member of this blog may post a comment.