शिर्डीत अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; तीन गुन्हे दाखल, ८ जणांविरुद्ध कारवाई 1 लाख 79 हजार 17 रुपयांचा मुद्देमाल जप्त; फरार आरोपींचा शोध सुरू
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी शहरात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू असा 1 लाख 79 हजार 17 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष पथक तयार करून ही मोहीम राबवली. या पथकात पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, राहुल डोके, रणजीत जाधव आणि अमृत आढाव यांचा समावेश होता.
15 ऑगस्ट 2026 रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी पंचांसमक्ष छापे टाकण्यात आले. या कारवाईत तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले.
तीन गुन्ह्यांचा तपशील
गुन्हा क्र. 743/2026 :
विनोद बाबुराव ठोंबरे (वय 50, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) याला ताब्यात घेण्यात आले. हबीब उर्फ सोहेल अन्सारी हा फरार असून 4,158 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा क्र. 744/2026 :
बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे (वय 54, रा. शिर्डी) याला ताब्यात घेण्यात आले. अलीम शेख व कलीम शेख हे दोघे फरार असून 12,953 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा क्र. 745/2026 :
जितेंद्र लालचंद लोढा (वय 48, रा. रूई, ता. राहाता) याला ताब्यात घेण्यात आले. बंटी लहामगे व अमोल जाधव हे दोघे फरार असून 1 लाख 61 हजार 906 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 व 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
Tags (5): शिर्डी, गुटखा कारवाई, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर पोलीस, Crime News


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.