Breaking News

तोफखाना हद्दीत अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; दोन आरोपी ताब्यात 160 किलो कथित गोमांसासह 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 



अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर शहरातील अवैध व्यवसायांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठला परिसरातील कथित अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 160 किलो कथित गोमांस, इलेक्ट्रिक मशीन, वजनकाटा, चाकू-सुरे असा एकूण 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 16 ऑगस्ट 2026 रोजी कोठला परिसरातील हनिफा किराणा स्टोअर्सच्या मागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान पोलिसांना दोन व्यक्ती मांसाचे तुकडे करताना आढळून आले. त्यानंतर कैफ शब्बीर कुरेशी (वय 47, रा. नालबंद खुंट, अहिल्यानगर) आणि मतीन ख्वॉजामिया कुरेशी (वय 50, रा. हमालवाडा, झेंडीगेट, नालबंद खुंट, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून 48 हजार रुपये किमतीचे 160 किलो कथित गोमांस, 30 हजार रुपयांची इलेक्ट्रिक मशीन, 4 हजार रुपयांचा वजनकाटा आणि 1 हजार 500 रुपये किमतीचे चाकू-सुरे असा एकूण 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. 703/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 271, 325, 3(5) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, 1995 (सुधारित 2015) कलम 5(क) व 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, राहुल द्वारके, सोमनाथ झांबरे, सागर ससाणे, भाग्यश्री भिटे आणि सुनिता पवार यांनी सहभाग घेतला.

Tags: अहिल्यानगर, तोफखाना पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, अवैध कत्तलखाना, गोमांस जप्त


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.