कोपरगावमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ₹5.10 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठावर सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ₹5.10 लाखांचा माल ताब्यात घेण्यात आला असून एका तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी भुसार परिसरात छापा टाकण्यात आला. तेथे नदीपात्रातून परवानगीशिवाय वाळू भरून वाहतूक करण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सम्यक बाळासाहेब मेहेरखांब (वय 20) याला ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडे विना क्रमांकाचा पॉवरट्रॅक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू आढळून आली. आवश्यक परवानगी किंवा कागदपत्रे सादर करता न आल्याने वाहन व वाळू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी अंदाजे ₹5 लाख किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ₹10 हजार किमतीची वाळू असा एकूण ₹5.10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
Tags: #कोपरगाव #अवैधवाळूवाहतूक #अहिल्यानगरपोलीस #गोदावरी #गुन्हेवार्ता


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.