Breaking News

कर्जमाफीतील जाचक अटी हटल्याने कर्जत-जामखेडमधील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना दिलासा – रोहित पवार

 



जामखेड,  : कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्यासाठी शेतकऱ्यांसोबत केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

याबाबत जामखेड येथे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत रोहित पवार यांचा नागरी सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून शेतकरी आणि जनतेच्या एकजुटीचा असल्याचे नमूद केले.

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्यासाठी पंढरपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले. या संघर्षानंतर सरकारने संबंधित अटी हटवल्याने हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक संघर्षात मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातही जनहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.