शेतकऱ्यांना आता घरबसल्या कळणार खतांचा साठा; FFS प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन
जिल्ह्यात 'FFS डिजिटल खत वितरण प्रणाली'ची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया
अहिल्यानगर दि. 20 (जिमाका) केंद्र शासनाचे रसायन व खत मंत्रालय आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या नवीन 'Framework for Fertilizer Sale (FFS)' डिजिटल प्रणालीच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची विशेष आढावा बैठक संपन्न झाली.बैठकीमध्ये FFS ॲप कार्यपद्धती व खत नियोजन,शेतकऱ्यांसाठी पारदर्शक, सुलभ व तंत्रज्ञानाधारित खत वितरण व्यवस्थेवर विशेष भर देणे इ .विषयी चर्चा झाली.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे व विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबुराव हराळ यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी FFS डिजिटल प्रणालीची वैशिष्ट्ये व फायदे
पिकाच्या गरजेनुसार खत शिफारस (GFR)
सातबारा व पीक नोंदीनुसार जमिनीच्या क्षेत्रफळानुसार अचूक खतांचे प्रमाण (उदा. युरिया, डीएपी, एनपीकेएस) अॅपद्वारे सुचविले जाते, ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल.
सुलभ व पारदर्शक खरेदी व्यवस्था शेतकऱ्यांना वाजवी व शासकीय दरात खते उपलब्ध होऊन कोणत्याही सक्तीशिवाय केवळ आवश्यक खतांचीच खरेदी करणे शक्य होणार आहे.
लाईव्ह स्टॉक व केंद्राची निवड (पारदर्शक व स्मार्ट वितरण)
शेतकरी दुकानात जाण्यापूर्वीच तालुक्यातील अधिकृत कृषी सेवा केंद्रांमधील उपलब्ध प्रत्यक्ष साठा (Live Inventory) तपासून स्वतःच्या पसंतीचे केंद्र निवडू शकतात.
डिजिटल QR पास व प्रतिनिधी सुविधा ॲपवर बुकिंगनंतर मिळणारा QR कोड e-PoS वर स्कॅन करून खत मिळेल. शेतकरी स्वतः अथवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे ३ दिवसांच्या आत खत खरेदी करू शकतात.
जिल्ह्यात ६५,००० मेट्रिक टनांपेक्षा अधिक खतांचा मुबलक साठा उपलब्धः टंचाईची शक्यता नाही तसेच जिल्ह्यातील परवान्यांचे अद्ययावतीकरण पूर्ण झाले असून उर्वरित प्रकरणांमधील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच खत वितरणातील पारदर्शकतेसाठी गोदामातील प्रत्यक्ष साठा व e-PoS मधील डिजिटल साठा नियमितपणे अद्ययावत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आधुनिक व पारदर्शक खत वितरणासाठी FFS ॲपचा जास्तीत जास्त वापर करुन आवश्यक असणाऱ्या खतांचे आरक्षण करुन ऐन हंगामात होणारी गैरसोय टाळावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
#अहिल्यानगर #FFSडिजिटलप्रणाली #खतवितरण #शेतकरी #कृषीविभाग


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.