Breaking News

आश्रमशाळा, निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये बालसुरक्षेसाठी ‘चाईल्ड सेफ्टी ऑडिट’; बालहक्क आयोगाचा आढावा

 



मुंबई : राज्यातील आश्रमशाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये बालकांना सुरक्षित, निरोगी आणि बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांचा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आढावा घेण्यात आला. बालकांची सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, निवास, स्वच्छता, अन्न-पाणी, बालहक्कांचे संरक्षण तसेच संबंधित यंत्रणांमधील समन्वय याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयोगाच्या कार्यालयात आयोजित बैठकीस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लाखेपाटील, अतुल देसाई, प्रविण भुजाडे, मिलन जंगम तसेच आयोगाच्या सचिव वंदना जैन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

२४ तास जबाबदारीने काम करण्याचे निर्देश

निवासी संस्थांमध्ये बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकारी, अधीक्षक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी २४ तास संवेदनशीलता व जबाबदारीने कार्य करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

वरिष्ठ स्तरावरून देण्यात येणाऱ्या सूचनांची तळागाळातील यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याचे नियमित परीक्षण करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

‘चाईल्ड सेफ्टी ऑडिट’वर भर

आश्रमशाळा आणि निवासी संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा बालकांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी ‘चाईल्ड सेफ्टी ऑडिट’ आणि प्रभावी देखरेख व्यवस्था विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

या ऑडिटमध्ये पिण्याचे पाणी, अन्नाची गुणवत्ता, आरोग्य सुविधा, स्वच्छता, CCTV व्यवस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांची पडताळणी, तक्रार निवारण यंत्रणा तसेच विद्यार्थ्यांचा अभिप्राय या बाबींचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली.

बालकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि निवासी संस्थांमध्ये बालस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

#आश्रमशाळा

#बालहक्कआयोग

#ChildSafetyAudit

#MaharashtraNews

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.