Breaking News

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धा; १ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रवेशिका स्वीकारल्या जाणार


अहिल्यानगर | प्रतिनिधी

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. नवीन पिढीला थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, युद्धनीती आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय व्हावा, या उद्देशाने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालये तसेच खुल्या गटातील विद्यार्थी आणि नागरिकांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी स्थापन करण्यात आलेल्या **'पराक्रम दिन समिती'**मध्ये इतिहास अभ्यासक काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर आणि कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे.

स्पर्धांसाठी अठराव्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे, अपराजित योद्धा, त्यांचे संघटन कौशल्य, युद्धनीती, स्वामीनिष्ठा, दिल्ली मोहीम, बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते तसेच जगप्रसिद्ध पालखेड विजय हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

निबंध व वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट, तर रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुला गट अशा दोन स्तरांवर होणार आहे.

निबंधासाठी १,००० शब्दांची मर्यादा असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप केलेला निबंध PDF स्वरूपात अपलोड करावा लागणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी ७ मिनिटांपर्यंतचा स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ सादर करावा लागेल. त्यामध्ये कोणतेही व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स तसेच एआय-निर्मित प्रतिमांचा वापर करता येणार नाही.

रिल्स स्पर्धेसाठी २ ते ३ मिनिटांची स्वतःच्या आवाजातील रिल्स तयार करून अपलोड करावी लागेल. विषयाला अनुरूप ठिकाणी चित्रीकरण आवश्यक असून, संदर्भानुसार इमेज व साऊंड मिक्सिंगसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मर्यादित वापर करता येणार आहे.

स्पर्धांसाठी आवश्यक संदर्भ, ई-बुक, संदर्भ पुस्तकांची यादी, प्रश्नावली, नियमावली, बक्षिसांची माहिती आणि ऑनलाइन प्रवेशिका भरण्याची सुविधा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धांबाबत अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय, अहिल्यानगर येथे ९११२२२८७६९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

#थोरले_बाजीराव_पेशवे #पराक्रम_दिन #निबंध_स्पर्धा #वक्तृत्व_स्पर्धा #ReelsCompetition #महाराष्ट्र #AMRUT #विद्यार्थी #अहिल्यानगर #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.