Breaking News

अमली पदार्थांविरोधात अहिल्यानगरात जनजागृती अभियान; व्यसनमुक्त समाजासाठी सर्वांनी पुढे यावे – प्रा. राम शिंदे

 अहिल्यानगर | प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी भव्य जनजागृती अभियान आणि व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. "एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याकडे एक सामूहिक पाऊल" या संकल्पनेवर आधारित अभियानात हजारो विद्यार्थी, युवक, नागरिक आणि विविध शासकीय विभागांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी, "आजचा तरुण हा देशाच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा," असे आवाहन केले.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'नशामुक्त भारत' संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती सुरू असल्याचे सांगितले. "प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि समाजसेवेत स्वतःचे भविष्य घडवावे," असे त्यांनी सांगितले.

प्रा. राम शिंदे यांनी पुढे सांगितले की, अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. चुकीच्या प्रवृत्तींविरोधात माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. "व्यसनाला नाही, तर स्वप्नांना होकार द्या," असा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नाही तर कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीवरही गंभीर परिणाम होतात. मानसिक ताण, आर्थिक नुकसान, गुन्हेगारी आणि सामाजिक विघटनाला व्यसन कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करत या अभियानामुळे समाजात व्यसनमुक्तीबाबत प्रभावी जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार काशिनाथ दाते यांनी व्यसन ही समाजाला लागलेली गंभीर कीड असल्याचे सांगत तरुणांनी ध्येय निश्चित करून त्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. समाजमाध्यमांचा वापर केवळ सकारात्मक आणि विकासात्मक हेतूंसाठी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




#अहिल्यानगर #व्यसनमुक्तअहिल्यानगर #DrugFreeAhilyanagar #नशामुक्तभारत #DrugFreeIndia #रामशिंदे #राधाकृष्णविखेपाटील #अहिल्यानगरपोलीस #AntiDrugCampaign #Maharashtra

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.