Breaking News

महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई | प्रतिनिधी

"महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो," अशा शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला' मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

राज्य सरकारच्या या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मराठी भाषा शिकून प्रवाशांशी अधिक आत्मीयतेने संवाद साधण्याच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेत व्यवहारिक मराठी शिकावी, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले. त्यांच्या मते, मराठी भाषा शिकल्यामुळे चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मानही जपला जाईल.

या अभियानाच्या आढावा बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ, तसेच मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे मराठी भाषेचा प्रसार होण्यास आणि विविध भाषिक समाजामध्ये संवादाचे बंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Maharashtra #Marathi #PratapSarnaik #TransportDepartment #MarathiLanguage #DriverTraining #Mumbai #BreakingNews


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.