सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या विकासकामांना गती द्या; ३४,७३२ कोटींच्या आराखड्याची वेळेत अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील सर्व कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळा हा राज्याच्या प्रतिष्ठेचा विषय असून सर्व विभागांनी प्रभावी समन्वय साधत विकासकामांना गती द्यावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, तोपर्यंत कामांमध्ये प्रत्यक्ष आणि गुणात्मक प्रगती दिसून यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्यांची कामे पूर्ण करणे, निर्धारित वेळेत कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करणे तसेच महानगर गॅस कंपनीने नाशिक महानगरपालिकेशी समन्वय साधून गॅस जोडणीची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीअंतर्गत नाशिक रिंग रोड, साधुग्राम उभारणी, रेल्वे स्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेसची व्यवस्था आणि विस्तृत पार्किंग सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच 'डिजिटल कुंभ' संकल्पनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), 'कुंभदूत' एआय सहाय्यक, डिजिटल ट्विन, स्मार्ट पार्किंग, हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी व सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे निर्देश देण्यात आले.
भूसंपादन, रिंग रोड, साधुग्राम आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, केंद्र व राज्य शासन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करून सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, भव्य आणि संस्मरणीय करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#सिंहस्थकुंभमेळा #नाशिक #कुंभमेळा२०२७ #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्रशासन


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.