Breaking News

मुकुंदनगर हल्ला प्रकरणाचा दुर्दैवी शेवट; गंभीर जखमी धीरज परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन

 



रुग्णालयाबाहेर नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी; परिसरात तणावाचे वातावरण, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज परदेशी हे मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर लोखंडी दांडक्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणात महापालिकेतील वायरमन युनूस शेख याच्यासह अन्य आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

मास्टरमाईंड आणि कटाचा तपास करण्याचे निर्देश

या घटनेची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली होती. हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण आहे, या हल्ल्याला आर्थिक पाठबळ कोणी दिले आणि संपूर्ण कटामागे नेमके कोण आहेत, याचा सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असतील तर त्यावेळी प्रभावी कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

धीरज परदेशी यांच्या निधनानंतर शहरात संतापाची भावना व्यक्त होत असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक आणि नातेवाईकांकडून केली जात आहे.

दरम्यान, रुग्णालय परिसरासह शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

#अहिल्यानगर #मुकुंदनगर #धीरजपरदेशी #मुकुंदनगरहल्ला #अहिल्यानगरबातम्या #हल्लाप्रकरण #पोलीसकारवाई #कायदा_आणि_सुव्यवस्था #रुग्णालयात_तणाव #अहिल्यानगर_न्यूज #महाराष्ट्रबातम्या #BreakingNews #CrimeNews #LatestNews #AaplaSatyaAhilyanagar

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.