डिजिटल महावितरणमुळे वीज सेवा आता मोबाईलवर; ग्राहकांना ऑनलाइन सुविधांचा लाभ
**मुंबई | प्रतिनिधी**
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्राहकांसाठी सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने महावितरणने विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोबाईल ॲप आणि वेब सेल्फ सर्व्हिस पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या मिळत आहेत.
महावितरणच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना वीज बिल पाहणे व भरणे, तक्रार नोंदविणे व तिची स्थिती तपासणे, मीटर रीडिंग सादर करणे, बिल व पेमेंटचा इतिहास पाहणे, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणे तसेच संपर्काची माहिती अद्ययावत करणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. एका खात्याखाली एकापेक्षा अधिक वीज जोडण्या व्यवस्थापित करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मोबाईल ॲपमध्ये मराठी भाषेचाही पर्याय उपलब्ध आहे.
डिजिटल सेवांचा वापर केल्यामुळे महावितरणच्या कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होते. ग्राहकांना अर्ज, तक्रार किंवा इतर सेवांची माहिती ऑनलाइन पाहता येत असल्याने वेळेची बचत होण्यास मदत होते.
महावितरणने ग्राहकांना सायबर सुरक्षेबाबतही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी फोन कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांना प्रतिसाद देऊ नये. तसेच ओटीपी, बँकिंग किंवा मोबाइल स्क्रीनशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत ग्राहक मोबाईल ॲपचाच वापर करावा, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.