Breaking News

नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा; शेतकऱ्यांना पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

 

मुंबई, दि. ७ : राज्यातील गाई-म्हशींच्या जाती सुधारण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेत शास्त्रशुद्धता व पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, २०२३' ची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाची सेवा घेताना शेतकऱ्यांनी केवळ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आणि अधिकृत सेवादातांकडूनच सेवा घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या कायद्याची अंमलबजावणी ५ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या वळूंच्या गोठविलेल्या प्रमाणित विर्यामात्रांचा वापर करून दुधाळ जनावरांच्या सुधारित पैदाशीला चालना देणे आणि प्रजननाशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

अधिनियमानुसार राज्यातील सर्व कृत्रिम रेतन केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, तपासणी, झडती आणि नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकारही त्याला देण्यात आले आहेत.

कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. विहित मानकांचे पालन न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड, नोंदणीशिवाय सेवा देणे किंवा अप्रमाणित विर्याचा वापर केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड, तर दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा २ लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

डॉ. पाटील यांनी संबंधित संस्था आणि सेवा पुरवठादारांनी तातडीने नोंदणी करून घ्यावी, तसेच शेतकऱ्यांनी कृत्रिम रेतनासाठी प्रमाणित विर्यामात्रांचाच वापर करावा, सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासावा आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी, असेही आवाहन केले आहे.

या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे उच्च उत्पादनक्षम वंशाची निर्मिती, दूध उत्पादनात वाढ, जनावरांच्या प्रजनन कार्यक्षमतेत सुधारणा, पशुधनाचा दीर्घकालीन विकास आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

 कृषी, पशुसंवर्धन, शासन, दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र


 Maharashtra, Animal Husbandry, Artificial Insemination, Dairy Farming, Farmers

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.