राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राची दमदार कामगिरी; शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ४ : शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचे संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थीकेंद्रित शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राने शालेय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान कायम राखले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पीजीआय 2.0 (Performance Grading Index) मध्ये महाराष्ट्राने देशात दुसरे स्थान कायम राखले असून, पीएम श्री शाळांसह राज्यातील सर्व शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक अभिनव उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत विद्यार्थ्यांचे शालेय आधार प्रमाणीकरण, आरटीई अंतर्गत सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांना मिळालेला शैक्षणिक लाभ, पवित्र पोर्टलची अंमलबजावणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि इतर महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी शालेय अभ्यासक्रमात नशामुक्ती विषयक पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये नशाविरोधी मार्गदर्शक व समुपदेशन समित्या स्थापन करून 'ड्रग-फ्री स्कूल' अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करणे आणि अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना राबविण्यावरही त्यांनी भर दिला.
#महाराष्ट्र #शालेयशिक्षण #देवेंद्रफडणवीस #Education #RTE


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.