अहिल्यानगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे
प्रवाशांना बसायलाही जागा नाही; मूलभूत सुविधांचा अभाव, नागरिकांत तीव्र नाराजी
अहिल्यानगर | प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे दावे केले जात असताना, अहिल्यानगरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा गंभीर अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर बसस्थानकातून राज्याच्या विविध भागांसाठी शेकडो एसटी बसेस दररोज धावतात. तरीही प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बाकडे उपलब्ध नाहीत. स्थानकावर अवघी सात ते आठ बाकडे असून तीही जीर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी अनेकांना तासन्तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना बसत आहे. बसस्थानकातील अपुऱ्या सुविधा, अस्वच्छता आणि गैरसोयीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"परिवहन खाते नफ्यात असल्याचे सांगितले जाते, मग प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बाकडे आणि मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अहिल्यानगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाची तातडीने पाहणी करून प्रवाशांसाठी पुरेशी आसनव्यवस्था, स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची सुधारणा आणि इतर आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांना सन्मानाने, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अधिकार आहे. महसूल वाढविण्याबरोबरच प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य परिवहन महामंडळाची आणि परिवहन विभागाची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.
#अहिल्यानगर
#एसटी बसस्थानक
#प्रताप सरनाईक
#महाराष्ट्र परिवहन
#प्रवासी सुविधा

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.