Breaking News

पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी; आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश

 


पुणे | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.

या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासाची माहिती घेतली. प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि सखोल पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे. दोषी व्यक्तीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाच्या दुःखात शासन सहभागी असून कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लवकरच पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:
#पिंपळवंडी #जुन्नर #पुणे #सुनेत्रापवार #पुणेपोलीस


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.