Breaking News

महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजनांचे लोकार्पण; आता १०५ योजना एकाच व्यासपीठावर

 



मुंबई, दि. १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. यामुळे पोर्टलवरील उपलब्ध योजनांची संख्या १०५ वर पोहोचली आहे.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने याच एकात्मिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल.


मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाडीबीटी व्यवस्था सुरू झाल्यापासून योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून योजनांचा गैरवापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.


यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त भुवनेश्वरी पी. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महाडीबीटी २.० ची वैशिष्ट्ये


महाडीबीटी २.० या नागरिककेंद्रित एकात्मिक प्रणालीद्वारे विविध योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या पोर्टलमध्ये सिंगल साइन-ऑन, रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी लाईव्ह डॅशबोर्ड आणि 'नो युवर बेनिफिट' यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.


याशिवाय आधार आधारित पडताळणी, एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रिया आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे. ऑफलाइन प्रक्रियेऐवजी ऑनलाइन प्रणालीला प्राधान्य देत मंजुरीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून नवीन योजना समाविष्ट करण्यासाठी लागणारा वेळही कमी करण्यात आला आहे.


शासनाने आणखी २३१ योजना महाडीबीटी पोर्टलवर समाविष्ट करण्याचे काम प्रक्रियेत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


#MahaDBT #महाडीबीटी #महाराष्ट्रशासन #DevendraFadnavis #MaharashtraGovernment


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.