जलसंधारण सप्ताहातून ‘जलसाक्षर’ अहिल्यानगरचा संकल्प!
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; नागरिकांना जलसंधारणाची शपथ, २१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन’
अहिल्यानगर, दि. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याची उत्साहपूर्ण सुरुवात आज अहिल्यानगर जिल्ह्यात झाली.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. जलसंधारणाचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून ‘जलसाक्षर’ समाज निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
संपूर्ण सप्ताहात जिल्हाभर विविध जनजागृतीपर आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळांमध्ये जलसंधारण विषयावरील निबंध, चित्रकला, पोस्टर आणि वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच जलपूजन, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांद्वारे विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये पाणी संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन, जलसाठ्यांचे संरक्षण, मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांचा प्रभावी वापर आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर यावर सप्ताहात विशेष भर दिला जाणार आहे.
२१ ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’
जलसंधारण सप्ताहातील प्रमुख उपक्रम म्हणून २१ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा मुख्यालयात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, उद्याचे भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या वॉकेथॉनमागे आहे.
या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
यावेळी महापौर ज्योती गाडे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
#जलसंधारणसप्ताह2026
#अहिल्यानगर
#डॉराधाकृष्णविखेपाटील
#महा_वॉकेथॉन
#पाणीसंवर्धन


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.