Breaking News

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार



शिर्डी, दि. ३ : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिपत्याखालील उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे प्रशासकीय बदलीने नियुक्त झालेल्या डॉ. मीरा ढास यांनी आज माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

डॉ. ढास या जुलै २००८ मध्ये शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात मंत्रालय, मुंबई येथे उपसंपादक म्हणून सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, पुणे तसेच विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सहाय्यक संचालक म्हणून काम पाहिले. पुढे जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्या जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तेथून प्रशासकीय बदलीने त्यांची उप माहिती कार्यालय, शिर्डी येथे माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. ढास यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गाडीलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. ढास म्हणाल्या की, प्रभावी संवाद माध्यमांचा आणि विविध सोशल मीडियाचा वापर करून शासनाच्या जनकल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील. शिर्डी हे श्री साईबाबांच्या पावन भूमीमुळे जगभर प्रसिद्ध असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. साईभक्त व नागरिकांसाठी शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असून त्या उपक्रमांची सकारात्मक माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उप माहिती कार्यालय, शिर्डी येथील कर्मचारी मंगेश रसाळी आणि अभिजीत मुठे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मीरा ढास यांचे स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.