Breaking News

महिला घरी अन् पती कार्यालयात! राहाता तालुक्यात ‘त्या’ ग्रामपंचायतीतील कथित बोगस कर्मचारी प्रकरणाने खळबळ

 


राहाता : राहाता तालुक्यातील हनुमंतगाव ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर पदावर नियुक्त असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या उपस्थितीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित महिला प्रत्यक्षात कार्यालयात गैरहजर असतानाही तिच्या नावावर नियमित हजेरी लावून शासकीय वेतन अदा केले जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाज करत नसून, तिच्या जागी तिचे पतीच कथितरीत्या ग्रामपंचायतीतील संगणक ऑपरेटरचे कामकाज सांभाळत आहेत. हा प्रकार मागील चार ते पाच वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी ग्रामस्थ विकास फणसे आणि प्रफुल्ल पाळंदे यांनी राहाता तहसीलदार, पंचायत समिती तसेच ग्रामविकास विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीची हजेरी नोंदवही, वेतन नोंदी, कार्यालयीन कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. आरोप सत्य आढळल्यास संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करून शासकीय निधीच्या कथित गैरवापराबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


#HanumantgaonNews #RahataTaluka #GramPanchayat #GovernmentFunds #AdministrationInquiry


No comments

Note: Only a member of this blog may post a comment.