राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौकात रंगला क्रीडोत्सव; विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वेधले नागरिकांचे लक्ष
हॉकी, मल्लखांब, तलवारबाजी, रायफल शूटिंग, सायकलिंगसह विविध क्रीडा प्रकारांचे थरारक सादरीकरण
अहिल्यानगर : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) भव्य क्रीडोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हॉकी, सायकलिंग, मल्लखांब, रायफल शूटिंग, तलवारबाजी, ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, खो-खो आणि बास्केटबॉल अशा विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
खेळाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होते. शहरात क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
“खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होते. अपयश स्वीकारून पुन्हा प्रयत्न करण्याची आणि यश मिळविण्याची जिद्द खेळातून निर्माण होते,” असे मत महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलिंपिक संघटना, विविध एकविध क्रीडा संघटना आणि क्रीडा मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच चौकात खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी महाराज आणि मेजर ध्यानचंद यांना अभिवादन
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सागर अलचेट्टी व ग्रुप यांच्या मार्गदर्शनाखाली झुंबा नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, सतीश शिंदे, मनोज दुल्लम, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सुनील जाधव, कोमल वाकळे, मनीषा पुंडे, ज्येष्ठ पत्रकार मोहनीराज लहाडे, अल्ताफ कडकाले, सुधीर चपळगावकर, वेदपाल तनवर आदी उपस्थित होते.
नव्या पिढीला क्रीडा संस्कृतीची प्रेरणा
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत २०३० कॉमनवेल्थ गेम्स आणि २०३६ ऑलिंपिक गेम्सच्या आयोजनासाठी प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे सांगत, अशा कार्यक्रमांमधून नव्या पिढीला खेळाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत काळोखे यांनी हॉकीचे महान खेळाडू आणि ऑलिंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती देत भारतीय हॉकीच्या विकासातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
नगरसेवक करण कराळे यांनी आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. अहिल्यानगरमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत आणि त्यांनी देशासाठी पदके मिळवावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे, असे आवाहन केले.
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी खेळ हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून व्यक्तिमत्त्व विकासासोबतच करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. पालकांनी मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
शहरात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती ठरल्या आकर्षण
कार्यक्रमातील विविध क्रीडा प्रात्यक्षिके हे प्रमुख आकर्षण ठरले. हॉकी, सायकलिंग, मल्लखांब, रोलर हॉकी, रायफल व पिस्तूल शूटिंग, तलवारबाजी, ज्युदो-कुराश, कुस्ती, बॉक्सिंग, खो-खो आणि बास्केटबॉल या खेळांचे खेळाडूंनी कौशल्यपूर्ण सादरीकरण केले.
विशेषतः पुरलेला मल्लखांब आणि रोप मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांना रोमांचित केले. मल्लखांबपटूंनी सादर केलेल्या विविध कसरतींना नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
विविध क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. समर्थ विद्यामंदिर आणि जय बजरंग विद्यालय, सावेडीच्या विद्यार्थ्यांनी ढोल पथकासह मिरवणूक काढत कार्यक्रमात उत्साहाची भर घातली.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सायकल भेट
क्रीडा दिनाच्या निमित्ताने सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी इन्फिनिटी सायक्लोथॉन, अहिल्यानगर, बाईक टेक पॉइंट आणि सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना सायकल भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे, संतोष वाबळे, रमेश जगताप, सागर पवार आणि अवदूत शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी समर्थ प्रशालेच्या प्राचार्या वसुधा जोशी, क्रीडा शिक्षक लोंढे सर, जय बजरंग विद्यालयाच्या साळुंखे मॅडम, खो-खो संघटनेचे विकास परदेशी, मनिष राठोड, प्रसाद पाटोळे, विश्व मिस्किन यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सादरीकरण रावसाहेब बाबर यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन, अहिल्यानगर क्रीडा, प्रोफेसर कॉलनी चौक, मल्लखांब, मेजर ध्यानचंद
#राष्ट्रीयक्रीडादिन #अहिल्यानगर #क्रीडोत्सव #मल्लखांब #SportsDay









No comments
Note: Only a member of this blog may post a comment.