लोकसंवाद-2026’ अंतर्गत सायबर सुरक्षेचा जागर सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहा; पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांचे आवाहन
अहिल्यानगर, दि. २३ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, जनहिताचे उपक्रम आणि महत्त्वाच्या सामाजिक विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बोल्हेगाव येथील स्वामी सामाजिक प्रतिष्ठान गणेश मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी उपस्थित नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यासोबत ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, बनावट सोशल मीडिया अकाऊंट, ओटीपीची मागणी, आर्थिक व्यवहारातील फसवणूक आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर यांसारख्या सायबर गुन्ह्यांचे प्रकारही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
अनोळखी लिंक आणि संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट, संदेश किंवा लिंकवर तातडीने विश्वास ठेवू नये. कोणत्याही व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती, बँक खात्याचे तपशील अथवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन टिपरसे यांनी केले.
आकर्षक ऑफर, बक्षीस, नोकरी किंवा आर्थिक मदतीचे आमिष दाखविणारे संदेश प्राप्त झाल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही कृती करू नये. सोशल मीडिया अकाऊंटचे मजबूत पासवर्ड ठेवणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे, अनोळखी ॲप्लिकेशन डाउनलोड न करणे आणि संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे या बाबींची नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कारवाई करा
सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून आर्थिक व्यवहार थांबविण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि जनहिताच्या विषयांसोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर जनजागृती करण्याचा प्रयत्न ‘लोकसंवाद-2026’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून डिजिटल माध्यमांचा सुरक्षित, जबाबदार आणि सजग वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती
यावेळी स्वामी सामाजिक प्रतिष्ठान, बोल्हेगावचे अध्यक्ष मदन आढाव, सचिव प्रमोद कोरडे, उमेश आढाव, बद्रीनाथ देशमुख, प्रकाश सप्रे, निलेश मंचरकर यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
#लोकसंवाद2026 #सायबरसुरक्षा #अहिल्यानगर #सायबरक्राईम #गणेशोत्सव


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.