अहिल्यानगर शहरात कथित कुंटणखान्यावर LCBचा छापा; दोन महिलांची सुटका
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील पानसरेवाडा परिसरात घरातून कथित वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी एका ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अवैध धंद्यांबाबत माहिती घेत होते.
दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वे स्टेशन परिसरातील एका घरात कथित वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करण्यासाठी पंचांच्या उपस्थितीत पथकातील एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान झिनत फैय्याजअली महंमद (वय ४४) हिला ताब्यात घेण्यात आले. घराची झडती घेतल्यानंतर तेथे दोन महिला आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेने या महिलांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका करून त्यांना संरक्षणाच्या दृष्टीने ताब्यात घेतले. आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालविल्याचा आरोप संबंधित महिलेवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४५/२०२६ अन्वये स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे
अहिल्यानगर LCB, पानसरेवाडा, पोलिस कारवाई, कोतवाली पोलीस, गुन्हेगारी बातम्या


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.