विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १० टक्क्यांपर्यंतच; स्कूल बॅग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतिप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, याची शाळांनी काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे आणि शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘दप्तर वेळापत्रक’ तयार करण्याच्या सूचना
शाळांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये. त्या दिवसाच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणि वह्या आणल्या जातील, यासाठी वर्गनिहाय ‘दप्तर वेळापत्रक’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना दररोज सर्व पुस्तके घरी घेऊन जावी लागू नयेत यासाठी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आहेत.
पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी दप्तराची गरज कमी करण्यावर भर
पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, अशा पद्धतीने शाळांनी नियोजन करावे, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.
तसेच घरातून जड पाण्याची बाटली आणण्याची गरज पडू नये यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सहावी ते आठवीसाठी १० दिवस ‘दप्तरविरहित’
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात येणार आहे.
या काळात स्थानिक कारागीर आणि व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी तयार करणे, हस्तकला, कृषीविषयक कामे तसेच स्थानिक व्यवसायांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात येणार आहे.
याशिवाय वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी यांसारखे कृतिप्रधान उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी होण्यासोबतच त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार असून, शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी आणि विद्यार्थी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.
— जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवीकुमार शिंदे




No comments
Note: Only a member of this blog may post a comment.