महावितरणच्या विद्युत कामांत अनधिकृत मनुष्यबळाला लगाम घाला; दीपक पाचपुते यांची मागणी”
महावितरणच्या विद्युत कामांत अनधिकृत मनुष्यबळाला लगाम घाला
अहिल्यानगर, दि. २७ सप्टेंबर २०२६ : महावितरणच्या विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्र, डी.ओ. फ्यूज, मीटर तसेच अन्य विद्युत उपकरणांवरील कामे अनधिकृत व्यक्तींकडून करून घेतली जात असल्यास त्यास तातडीने प्रतिबंध करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाचपुते यांनी केली आहे.
महावितरणच्या संचालक (संचालन) कार्यालयाने परिपत्रक क्र. ३३२३०, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी अनधिकृत व्यक्तींकडून विद्युत यंत्रणेवरील कामे करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व विभाग व उपविभागांमध्ये या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी पाचपुते यांनी केली आहे.
नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डी.ओ. फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीवरील बिघाड शोधणे, ग्राहकांच्या वीज तक्रारी सोडविणे, मीटर काढणे तसेच विद्युत यंत्रणेवरील इतर तांत्रिक कामे अधिकृत व पात्र कर्मचाऱ्यांकडूनच करून घेण्यात यावीत. अनधिकृत व्यक्तींकडून अशा स्वरूपाची कामे करून घेतल्यास संबंधित व्यक्ती तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023 मधील सुरक्षा तरतुदींचा विचार करता, विद्युत कामे अधिकृत व पात्र व्यक्तींकडूनच करून घेणे आवश्यक असल्याचेही पाचपुते यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणने अचानक तपासणी मोहीम राबवून विद्युत कामे करणाऱ्या व्यक्तींची अधिकृतता व पात्रता तपासावी, अनधिकृत मनुष्यबळाचा वापर आढळल्यास संबंधितांची विभागीय चौकशी करून सेवाविनियमांनुसार कारवाई करावी. तसेच यापूर्वी अनधिकृत व्यक्तींकडून विद्युत कामे करून घेतल्यामुळे अपघात झाले असल्यास अशा घटनांची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दीपक पाचपुते यांनी केली आहे.
#महावितरण #MSEDCL #अहिल्यानगर #विद्युतसुरक्षा #वीजतक्रार #विद्युतकामे #दीपकपाचपुते #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.