Breaking News

अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात – पालकमंत्री


 

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; जामखेडसाठी उजनीचे अतिरिक्त पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न

दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळात नागरिकांना पाणी आणि हाताला काम देण्यासाठी परिपूर्ण नियोजन करा – प्रा. राम शिंदे

जामखेड : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, जामखेड तालुक्यासाठी उजनी धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून नागरिक, शेती आणि पशुधनाच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

कर्जत व जामखेड तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती तसेच पाणी व चारा टंचाईबाबत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे आढावा बैठक झाली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार सुनील कर्जतकर, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

कर्जत आणि जामखेड तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे. गावागावातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिले.

पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असून, पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत आवश्यक असलेल्या चाऱ्याचे नियोजन पूर्ण करावे. दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, यासाठी रोजगाराच्या कामांची संख्या वाढवून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर

दुष्काळ तसेच शेतीच्या नुकसानीच्या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतीचे सरसकट पंचनामे करण्यात येणार असून पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या वीज खांबांची तसेच डीपीची कामे महावितरणने तातडीने पूर्ण करावीत. दुष्काळी परिस्थितीत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन समस्या जाणून घ्याव्यात

दुष्काळाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच न राहता गावोगावी भेटी देऊन शेतकरी व नागरिकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिला.

पाणी आणि रोजगाराचे परिपूर्ण नियोजन करा – प्रा. राम शिंदे

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणी आणि हाताला काम उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. ‘विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे निधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. गावागावातील मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत कर्जत व जामखेड तालुक्यातील पाणीपुरवठा, चारा, रोजगार, वीजपुरवठा, अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.

#कर्जत #जामखेड #उजनी #दुष्काळ #पाणीटंचाई #चारा #रोजगार #शेतकरी #अहिल्यानगर #दुष्काळनिवारण #महाराष्ट्र #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.