Breaking News

पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळू नका; दावे-हरकतींची काटेकोर छाननी करा – डॉ. प्रवीण गेडाम

 



मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि नागरिकस्नेही करण्यावर भर

अहिल्यानगर, दि. ११ सप्टेंबर : मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत प्रत्येक मतदाराची नोंद अचूकपणे तपासून यादी अद्ययावत, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याला प्राधान्य द्यावे. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही कारणाने चुकीने वगळले जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच प्राप्त दावे व हरकतींची नियमानुसार वस्तुनिष्ठ आणि काटेकोर छाननी करून निष्पक्षपणे निर्णय घ्यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे, विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच संबंधित मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

दावे-हरकतींवर पारदर्शक निर्णय घेण्याचे निर्देश

मतदार यादी पुनरीक्षणात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या बीएलओंची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे बीएलओंच्या कामाचा नियमित आढावा घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे. मतदारांच्या नोंदी तपासताना उपलब्ध कागदपत्रे, माहिती आणि प्रत्यक्ष पडताळणी यांचा योग्य समन्वय साधावा, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद, मतदाराचे स्थलांतर, मृत्यू किंवा अन्य कारणांमुळे नोंदीत बदल आवश्यक असल्यास त्याची नियमानुसार तपासणी करावी. प्राप्त दावे आणि हरकतींची योग्य पद्धतीने छाननी करून त्यावर पारदर्शक व नियमबद्ध निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रे मतदारस्नेही करण्यावर भर

आगामी काळात मतदान केंद्रांची रचना करताना मतदारांना कोणतीही अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी. मतदान केंद्राचे स्थान, मतदारांची संख्या, प्रवेशाची सुलभता आणि उपलब्ध मूलभूत सुविधांचा विचार करून मतदान केंद्रे अधिक नागरिकस्नेही करावीत.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू मतदारांना आवश्यक सुविधा सहज उपलब्ध होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.

नागरिकांनीही मतदार यादी तपासावी

नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि अन्य तपशील अचूक आहेत का, याची स्वतः खात्री करावी. नोंदीमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून नियमानुसार दुरुस्ती करून घ्यावी.

मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया निरंतर स्वरूपाची असल्याने पात्र नागरिकांना नोंदणी, दुरुस्ती किंवा आवश्यक बदल करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिकांचा समन्वय आवश्यक

मतदार यादी ही लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहावा आणि मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असावी, यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

पुनरीक्षणाच्या प्रगतीचा आढावा

बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची सद्यस्थिती, प्राप्त अर्ज, नोंदींची पडताळणी आणि आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी सूचना मांडल्या. प्रशासनाने या सूचनांची नोंद घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

जामखेड हिंदी मराठी पत्रकार तालुका संघटक रवी कुमार शिंदे

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.