महाराष्ट्राच्या दुर्गसंस्कृतीचा जागर; दिवाळीत रंगणार ‘अमृत दुर्गोत्सव 2026’
गड-दुर्गांच्या प्रतिकृती साकारून सहभागी होण्याचे आवाहन; 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी
अहिल्यानगर | प्रतिनिधी
महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह गड-दुर्गांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेअंतर्गत ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेला प्रोत्साहन देणे, दुर्गसंवर्धनाची भावना रुजविणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचा इतिहास व शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वी 2025 मध्ये आयोजित अमृत दुर्गोत्सव उपक्रमाची जागतिक विश्वविक्रमाची नोंद झाली होती.
जगभरातील नागरिकांना सहभागी होण्याची संधी
या दुर्गोत्सवामध्ये जगातील कोणतीही व्यक्ती, कुटुंब, गृहसंकुल, संस्था, गट, शाळा किंवा महाविद्यालय सहभागी होऊ शकते. नागरिकांनी घराचे अंगण, गृहसंकुलातील सार्वजनिक जागा, बाग, बाल्कनी किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी कुटुंबीय, बालगोपाळ व मित्रपरिवाराच्या सहभागातून गड-दुर्गाची प्रतिकृती तयार करावी.
महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांनाही परिसरात दुर्गांच्या प्रतिकृती तयार करून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
पर्यावरणपूरक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन
दुर्गाची प्रतिकृती तयार करताना उपलब्ध साहित्याचा सर्जनशील आणि पर्यावरणपूरक पद्धतीने वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. प्रतिकृतीची मांडणी, सजावट, ऐतिहासिक संदर्भ आणि सादरीकरण यामध्ये सहभागी नागरिकांना त्यांच्या कल्पकतेनुसार स्वातंत्र्य राहणार आहे.
प्रतिकृतीसोबत सेल्फी अपलोड करा
सहभागी व्यक्तीने तयार केलेल्या दुर्गाच्या प्रतिकृतीसोबत स्वतःचे Selfie/Photograph काढून ते अमृत दुर्गोत्सवाच्या अधिकृत डिजिटल व्यासपीठावर अपलोड करावे लागणार आहे.
पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल ‘अभिनंदन पत्र’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैधता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे अभिनंदन पत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. त्यासाठी आवश्यक डाउनलोड लिंक अथवा सूचना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऑनलाइन नोंदणी
नोंदणी कालावधी : 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://www.amrutdurgotsav.com/
अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-दुर्गांचा गौरव आणि शिवशौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी :
अहिल्यानगर अमृत कार्यालय
मोबाईल : 9112228769
चला, पुन्हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-दुर्गांचा गौरव जपूया; शिवशौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया आणि दुर्गसंस्कृतीचे संवर्धन करूया!
#अमृतदुर्गोत्सव2026
#दुर्गसंस्कृती
#महाराष्ट्राचागौरव
#शिवशौर्य
#गडदुर्गसंवर्धन

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.